मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदारी तयारी सुरू आहे. भाजपने राज्यातील २० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहेत. महायुती आणि महाआघाडीमधील अनेक जागांबाबत अजूनही धूसफूस दिसून येत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हयातील ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या उमेदवारीबाबतचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे सुध्दा गॅसवर आहेत. तर ठाणे लोकसभेत कोण उमेदवार असणार यावरही खल सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातील दोन जागेचा तिढा सुटत नसल्याने देान्ही कार्यकत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. कल्याण लोकसभेत शिवसेना शिंदेगट आणि भाजप कार्यकत्यांमध्ये मोठया प्रमाणात धूसफूस आहे. पूर्वीपासून कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला होता. तर श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून उतरविण्याची भाजपची खेळी होती मात्र भाजपची ही खेळी यशस्वी हेाताना दिसत नाही. त्यामुळे आता डॉ शिंदे यांनी कमळाच्या तिकिटावर लढावे अशी मागणी कार्यकत्यांकडून सुरू झाली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या तापट स्वभावामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र मुख्यमंत्रयांचे सुपूत्र असल्याने डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कशी कापली जाणार असाही प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या केंद्रीय मंत्रयांनी कल्याण लोकसभेचा दौरा करून चाचपणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना कल्याणातून उतरविण्याची चर्चाही भाजपच्या वरिष्ठांमध्ये झाली होती. स्थानिक कार्यकत्यांकडून कल्याण भाजप लढणार असे काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे म्हणतही होते. पण काही दिवसांपासून खासदार डॉ शिंदे हे कल्याण मतदार संघात खूपच सक्रीय झाल्याचे दिसून आले हेाते. मुख्यमंत्री सुपूत्र असल्याने त्यांचे कल्याण होणार आहे, अन्यथा शिंदेच्या नावावर फुलीच होती अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे. महायुतीकडून डॉ शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच महाविकास आघाडीकडून उमेवार जाहीर केला जाणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ? असा प्रश्न स्थानिक शिवसैनिकांची मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विचारण्यात आला हेाता त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महायुतीचा उमेदवार हा स्थानिक आणि आगरी समाजाचा असेल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कल्याणाचा सुभेदार कोण ? हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
तसेच ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे पक्षाचे राजन विचारे हे खासदार आहेत. पण अजूनही महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. कल्याणची नव्हे तर ठाण्याची तरी जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशिल आहेत, भाजपकडून संजीव नाईक यांचेही नाव चर्चेत होते. पण ठाण्याची जागा ही शिंदे गट सोडण्यास तयार नाही. त्यामुळे शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के स्पर्धेत आहेत. यापैकी एक नाव घोषित होण्याची शक्यता आहे.