डोंबिवली : रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलांना जोडणाऱ्या फलाट क्रमांक तीन आणि चार वरील जिन्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी ३० डिसेंबरला रात्री ११ वाजल्यापासून हा जिना प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४० दिवस हे काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले असून तोपर्यंत प्रवाशांनी पर्यायी जिन्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील फलाट क्रमांक ३ व ४ येथील उतरत्या जिन्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ३१ डिसेंबर पासून या कामाची दुरुस्ती करण्यात येणार असून या दुरुस्तीच्या कालावधीत प्रवाशांनी कल्याण दिशेकडील किंवा मधील असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यांचा वापर फलाट क्रमांक तीन किंवा चारवर चढ, उतार करण्यासाठी करावा. तसेच प्रवाशांनी फलाटावरून पादचारी पुलावर चढणे किंवा उतरण्यासाठी या भागातील सरकत्या जिन्यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेच्या वरिष्ठ बांधकाम अभियंत्याने केले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मुंबईकडे जाणाऱ्या धिम्या किंवा जलद लोकल धावतात. त्यामुळे या फलाटावर पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. फलाट क्रमांक ४ वरून मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. संध्याकाळच्या वेळेत मुंबईतून कामावरून निघालेला बहुतांशी नोकरदार जलद लोकलना पसंती देतो.

त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत फलाट क्रमांक चारवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या प्रवाशांना नंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन किंवा चारवर उतरल्यानंतर कल्याण बाजू किंवा सीएसएमटी बाजूकडील सरकात जिना, नियमितच्या जिन्याने इच्छित स्थळी जावे लागणार आहे. प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी जिन्यावरून जाताना झुंबड करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!