ठाणे : कोलशेत येथे रस्ता रुंदीकरणासाठी ४५० पेक्षा अधिक झाडे तोडली जाणार आहेत. मात्र कोलशेत भागातील रहिवाशांनी झाडे तोडणे व प्रत्यारोपण करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. वृक्ष तोडण्याविरोधात रहिवाशांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना ईमेलद्वारे तक्रार दिली आहे. संपूर्ण वृक्षारोपण प्रक्रिया, बेकायदेशीर व अवैज्ञानिक आहे. हे नियोजन पर्यावरणीयदृष्ट्या विनाशकारी असल्याचे सांगत रहिवाशांनी सर्व झाडांच्या संरक्षणाच्या योजनेत बदल करण्याची मागणी केली आहे.
लोढा आमारा गेट (एक्झिट गेट) ते नंदी बाबा मंदिरापर्यंत १.३ किमी लांबीच्या रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची तोड केली जात आहे. हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि वाढती उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यासाठी / पुनरोपंण करण्यास परवानगी देणे निराशाजनक बाब आहे असे रहिवाशायांचे म्हणणे आहे. ठाण्यातील पर्यावरणाचा र्हास फक्त भयावह नाही. परंतु नियमांचे उल्लंघन देखील होत आहे तसेच टीएमसी वेबसाइटवर प्रत्यारोपणाचा तपशील उपलब्ध नाही याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आलं आहे मेट्रो ४ बाधित वृक्षांच्या प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार्या मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या, वृक्ष तज्ञ डॉ. मानसी जोशी यांनी या वृक्षांचे सर्वेक्षण केले आहे या वृक्षांपैकी ५०-६० वर्षांहून अधिक जुन्या वारसदार झाडांचे रोपण केल्यास ती टिकणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. काही आंबा, अमरवृक्ष, कदंब अशा काही प्रजाती आहेत ज्यांच्यावर वाईट परिणाम होणार आहे. झाडांच्या सभोवताली पुरेसे क्षेत्र आहे , जे वृक्षांना क्षती न पोहोचवता सेवा रस्ता बनविण्यासाठी पुरेसे आहेत त्यामुळे वृक्ष तोड थांबविण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
*बाधित वृक्षांपैकी एक असलेला उर्वशी (एम्हेर्शिया नोबिलिस) नावाचा एक अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे, जो संपूर्ण शहरात एकच आहे. हा ब्रह्मदेशातील वृक्ष असून जो भारतात क्वचितच आढळतो. वृक्ष कायद्यानुसार या दुर्मिळ झाडाला स्पर्श करता येत नाही त्यामुळे संपूर्ण वृक्षांच्या संरेखनातील इतर झाडे काढण्यात अर्थ नाही असे राहिवाश्यांचे म्हणणे आहे त्यामुळे पालिका काय भूमिका घेते याकडं लक्ष वेधलंय.
…….