ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाययक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता पालिकचे अतिक्रमण विरोधी पथक चांगलेच आक्रमक झाले आहेत गुरूवारी पालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाले व हातगाडयांवर धडक कारवाई केली दोन सत्रात कारवाईची मोहिम सुरू राहणार आहे
ठाणे शहरात सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते ११ या दोन सत्रात कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे स्थानक परिसर, मार्केट परिसर व नौपाडा कोपरी परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ठाणे मार्केट परिसरात १० ते १२ हातगाड्या जप्त करण्यात आल्या तसेच मार्केट परिसरात दुकानांसमोरील फूटपाथवर विक्री करणाऱ्या १२० किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सॅटिस परिसर, मार्केट परिसर व नौपाडा- कोपरी परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. सदर कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे उपस्थित होते. कळवा प्रभाग समितीअंतर्गत कळवा नाका, कळवा बाजारपेठ, कळवा पूर्व, विटावा, आत्माराम पाटील चौक, खारीगांव मार्केट परिसर, 90 फूट रोड या परिसरात कारवाई करण्यात आली. यात १८ हातगाडी विक्रेते तर दुकानांसमोर फूटपाथवर विक्री करणाऱ्या ४५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.