ठाण्यातील कोळीवाड्यांचे महिनाभरात सिमांकन
ठाणे (उमेश वांद्रे ) : ठाणे व रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या सिमांकनाचे काम महिनाभरात सुरू करण्यात येईल, अशी माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज विधान भवनात दिली. या कामामुळे कोळीवाड्यांची जमीन परंपरागत रहिवाशांच्या नावावर होण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्या मागणीवरुन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात आज सायंकाळी बैठक बोलाविली होती. मात्र, काही तातडीच्या कामांमुळे महसूलमंत्री पाटील अनुपस्थित होते. त्यामुळे महसूल सचिवांकडून बैठक घेण्यात आली. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, दीपा गावंड, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, कल्पना चौधरी, कविता पाटील, नंदा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, रायगडच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार आदी उपस्थित होते.
मुंबईतील कोळीवाड्यांच्या धर्तीवर ठाणे व रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांमधील परंपरागत रहिवाशांच्या नावावर जमीन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोळी वा बिगर कोळी व्यक्तीकडून सरकारी जागेवर वर्षानुवर्षांपासून रहिवास केला असेल, त्यालाही जमीन देण्याची सरकारची भूमिका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केली होती. त्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार डावखरे प्रयत्नशील आहेत.
मुंबईच्या धर्तीवर ठाणे व रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या जमिनी परंपरागत रहिवाशांच्या नावावर केल्या जातील, असे महसूल सचिव श्रीवास्तव यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. येत्या महिनाभरात दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या सिमांकनाला सुरुवात केली जाईल. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या. मुंबईतील कोळीवाड्यांबाबत आराखडा तयार केला जात आहे. या कामात त्रूटी आढळल्यानंतर त्याची ठाणे व रायगडच्या आराखड्यात तातडीने दुरुस्ती केली जाईल, असेही श्रीवास्तव यांनी नमूद केले. कोळीवाड्यांच्या सर्वेक्षणावेळी मूळ रहिवाशांवर अन्याय होऊ नये, याबाबत काळजी घ्यावी, अशी सुचना बैठकीत करण्यात आली.