ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी, सिद्धीविनायक न्यासातर्फे १ कोटीचा धनादेश

जिल्ह्यातील शेतीला बळ देणार : – पालकमंत्री शिंदे

ठाणे :  श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी न्यासातर्फे ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार  अभियानासाठी  १ कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर व कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान केला.

जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला उभारी देण्याचे तसेच पाणी टंचाई मिटवण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि श्री सिद्धीविनायक सारख्या आणखीही काही संस्थांनी यात आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी दाखवावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.जलयुक्त शिवारसाठी जिल्ह्यात ४४ गावे निवडण्यात आली असून सुमारे ४० कोटींचा आराखडा आहे. सिद्धीविनायक तर्फे देण्यात आलेली मदत महत्वाची असून दोन वर्षांपूर्वी देखील न्यासाने या कामासाठी आपले योगदान दिले होते त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानले.

 

७४ कोटी ५० लाख रुपये अर्थसहाय्य

श्रीसिद्धीविनायक न्यासाने यापूर्वी ३४ जिल्ह्यांना रुपये ६७ कोटी ५० लाखांचा निधी वितरीत केला आहे व आता ७ जिल्ह्यांना प्रती जिल्हा रुपये १ कोटी याप्रमाणे एकूण रुपये ७ कोटी चे वितरण करण्यात येणार आहे.  यावेळी बोलतांना आदेश बांदेकर यांनी सांगितले कि, सिद्धिविनायक न्यास  नेहमीच सामाजिक जाणीवेतून मदत करीत असतो.  नैसर्गिक आपत्ती असो किंवा जलयुक्त सारखे अभियान, सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून गेल्या ४ महिन्यात रुपये ४ कोटी ५० लाखरुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना न्यासातर्फे देण्यात आली असल्याचेही आदेश बांदेकर यांनी सांगितले. या धनादेश प्रदान प्रसंगी श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त विशाखा राऊत, आनंद राव, महेश मुदलियार, वैभवी चव्हाण, सुबोध आचार्य, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, उप कार्यकारी अधिकारी रवी जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!