ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरातील लसीकरण केंद्रांवरही मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहरांतील नागरिकांची संख्या लक्षणीय असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. स्थानिक नागरिकांना लसीकरणात प्राधान्य मिळण्यासाठी आधार कार्डवरील पिन कोड क्रमांकानुसार नागरिकांची नोंदणी करावी, अशी मागणी नगरसेवक पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. पिनकोडमुळे स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंद करण्यात येते. मात्र, त्यावर भारतातील कोणत्याही केंद्रांवर लस नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. परंतु, त्याचा स्थानिक नागरिकांना फटका बसत आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांविरोधात नाराजी असतानाच, आता ठाणे शहरातही बाहेरच्या शहरातील नागरिकांना लस दिली जात असल्याचे उघडकीस आले आहे. ठाणे शहरातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलसह विविध ठिकाणी लसीकरण केले जाते. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मुंबईतील दादर, अंधेरी, घाटकोपर, नवी मुंबईबरोबरच भाईंदर, पनवेल येथील नागरिकांनी नोंदणी केली असल्याचे आढळले. विशेषत: ऑनलाईन नोंदणीत ठाणेकरांचे प्रमाण अल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीद्वारे ठाणेकरांऐवजी इतर शहरातील नागरिकांचा फायदा होत आहे याकडे पवार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे
ऑनलाईन कोट्याची वेळ जाहीर करा
कोविन अॅपवर १८ ते ४४ पर्यंतच्या नागरिकांची नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, ऑनलाईन कोटा केव्हा खुला होतो, याबद्दल नागरिकांना काहीही माहिती उपलब्ध होत नाही. अनेक नागरिकांना खुला झालेला कोटा पाहावयास मिळाला नाही. त्यामुळे रेल्वेच्या रिझर्व्हेशन सिस्टीमप्रमाणे सकाळी ८ वाजता नोंदणी खुली करावी, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
़़़़़़
k