ठाणे कारागृहातील बंद्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते

ठाणे, दि. 13 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील स्मृतीस्तंभ, ऐतिहासिक वधस्तंभास तसेच कारागृहात फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेस आमदार संजय केळकर व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्यावतीने कारागृहातील ऐतिहासिक वधस्तंभास व स्मृतीस्तंभास अभिवादन कार्यक्रम आज झाला. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर व आमदार केळकर यांनी कारागृहातील विविध कामांची तसेच सुविधांची पाहणी केली. वधस्तंभाच्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात येत असून त्याची पाहणीही यावेळी केली. उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, कारागृह अधिक्षक हर्षद अहिरराव, तहसीलदार युवराज बांगर आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती व आमदार निधीतून कारागृहात विविध कामे सुरू आहेत. स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतीकारकांना फाशी देण्यात आलेल्या वधस्तंभाचा परिसर स्मारक म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे दोन कोटी व आमदार संजय केळकर यांच्या निधीतून 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. वधस्तंभाच्या ठिकाणी अम्पिथिएटर उभारणे, लाईट व साऊंडशो उभारणे, वधस्तंभ परिसराचे सुशोभीकरण करणे आदी कामे सुरू असून दिवाळीपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कारागृहातील बंदींच्या कलागुणांचा अविष्कार असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी झाला.

जिल्हाधिकारी म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेण्यात येत आहे. कारागृहात असलेल्या बंदीजनांसाठीही कार्यक्रम असावा असे वाटत होते, त्यातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. स्वातंत्र्य लढ्यात ठाणे कारागृहात बंदी असलेल्या तसेच इथे फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती भावी पिढीला व्हावी, यासाठी वधस्तंभ स्मारकाचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कारागृहातील बंद्यांसाठी आणखी चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रास्ताविकात कारागृह अधिक्षक अहिरराव यांनी कारागृहात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

देशभक्तीपर नृत्य-गीतांतून बंद्यांनी जागविल्या आठवणी

यावेळी कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच पुरुष व महिला कैद्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जागविल्या. ऐ मेरे प्यारे वतन, वंदे मातरम्, माँ तुझे सलाम अशा विविध गीतांवर कैद्यांनी नृत्य केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!