श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी भूमिपूत्र कार्ड !
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीकडून खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे उमेदवार असणार आहेत. मात्र डॉ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना रिंगणात उतरविण्याची खेळी ठाकरे पक्षाकडून केली जात आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू आहे. डॉ श्रीकांत शिंदे यांना शहर देण्यासाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि आगरी कोळी समाजाचे नेते संतोष केणे यांना उमेदवारीची ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. कल्याणची जागा हि शिवसेना ठाकरे गटाच्या कोटयात आहे. महाविकास आघाडीची युती असल्याने काँग्रेसच्या केणे यांनी ठाकरे पक्षाकडून ही निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला जात आहे. संतोष केणे रिंगणात उतरले तर शिंदे यांना हि निवडणूक जड जाणार आहे अशीच चर्चा स्थानिक भूमिपु़त्रांमध्ये रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच समजला जातो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे खासदार आहेत. मुख्यमंत्रयांच्या सुपूत्राचा मतदार संघ असल्याने राज्यातील सर्वात महत्वाच्या मतदार संघातील लढाई म्हणून या लढतीकडे पाहिले जाणार आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा अजूनही झाली नसली तरी सुध्दा डॉ शिंदे हेच उमेदवार असणार आहेत.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून कोण उमेदवार असेल याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यामध्ये ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई, माजी आमदार सुभाष देसाई, आंनद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, विजय साळवी, सदानंद थरवळ आदींच्या नावाची चर्चा रंगली हेाती. मात्र डॉ शिंदे यांचा पराभव करण्यासाठी तोडीस तोड उमेदवाराच्या शोधात ठाकरे गट आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून रणनिती आखली जात असून, स्थानिक आणि भूमीपूत्र उमेदवार देण्याची खेळी ठाकरे गटाकडून आखली जात आहे.
काँग्रेसकडून कल्याण लोकसभेसाठी प्रदेश सचिव संतोष केणे हे इच्छूक उमेदवार आहेत. मात्र हि जागा ठाकरे गटाकडे असल्याने ठाकरे गटाने केणे यांना ऑफर केली आहे. केणे यांनी ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ठाकरे गटातील नेत्यांचे म्हणणे आहे. ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी केणे यांच्या नावाला सहमती दर्शविल्याची माहिती मिळत आहे, मात्र यावर अजूनही अधिकृत निर्णय झालेला नसून, केणे हे मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहेत संतोष केणे
काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक, ठाणे रायगड आणि पालघर परिसरातील आगरी कोळी समाजाचे नेते म्हणून ओळख आहे. राजकीय सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शांत, संयमी, स्वच्छ चारित्रयाचे, वारकरी, आध्यात्मिक म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी त्यांची आग्रही भूमिका होती, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेत बाधित होणा-या शेतक-यांना योग्य मेाबदला मिळण्यासाठी वेळोवेळी लढा दिला आहे. २७ गावातील प्रश्नांवर आवाज उठविला. संतोष केणे यांना ग्रामीण परिसरातील सर्वपक्षीय भूमिपुत्रांचा मोठया प्रमाणात पाठींबा असून, शिंदे गटाविरोधात भाजपची असलेल्या नाराजीचा फायदा त्यांना होऊ शकतो.