मुंबई, दि. २७ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावरून ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. मात्र, या लिफ्ट प्रवासाची विधानभवनात चांगलीच खमंग चर्चा रंगली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. विधान परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी तळमजल्यावरील लिफ्टच्या प्रतिक्षेत ठाकरे असताना, उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आले. विधानसभेच्या सभागृहासमोरील व्हरांड्यात (पॅसेज) दोघांची भेट झाली. दोघेही लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर निघून गेले. काही मिनिटांच्या या भेटीत दोघांत राजकीय चर्चा झाली का यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. लिफ्ट प्रवासाची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना, ना ना करते प्यार…, म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही. ना ना करते प्यार…, तुम्ही से प्यार कर बैठे, असे काही होणार नाही. ती भेट योगायोगाने झाली. मात्र या भेटीमुळे लिफ्टमधील बाहेर असल्यांना आता याचा धक्का बसला असेल, असे म्हटले. तसेच भिंतीला कान असतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू, अशी मिश्किल प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. विधानभवनात यामुळे राजकीय गोटात चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे.

ठाकरे – फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. लिफ्टमध्ये भेट झाली तरी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाहीत, असा टोला लगावला. ठाकरेंनी दोन वर्षापूर्वी लिफ्ट शिफ्ट करून कॉंग्रेससोबत गेले. त्यामुळे जनतेच्या लिफ्टमध्ये येऊन त्यांच्या मनातील सरकार स्थापन केल्याचे शिंदे यांनी म्हटले. भाजपकडून मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

याला पहिले बाहेर काढा – ठाकरे 

ठाकरे आणि फडणवीस हे विधानभवनातील लिफ्टमध्ये जाताना, गर्दी होती. मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर आदी मंडळी लिफ्टमध्ये होती. फडणवीस यांनी लिफ्टमधून बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान, ठाकरेंनी याला पहिले बाहेर काढा, असा मिश्किल टोला दरेकर यांना लगावला. तसेच लिफ्टमध्ये प्रवेश करताच दरेकर यांच्याशी हस्तांदोलन केले. विधानभवनात यावेळी खेळीमेळीचे वातावरण पहायला मिळाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!