सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील तेंडोलीमध्ये गव्याच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या गव्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गव्याने तेंडोली-भोमवाडी येथील शेतकरी संतोष तेंडोलकर यांच्या शेतातील शेंगदाणा, मिरची पीक, मका या पिकांचे नुकसान केले. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी तेंडोलकर यांनी केली आहे.
तेंडोली-भोमवाडी येथे नागरिकांनी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे तेथील शेतकरी ओढ्याच्या पाण्यावर शेती करतात. तेंडोलकर यांनी दीड एकर क्षेत्रात भुईमूग, कुळीथ, मिरची आणि जनावरांसाठी बाजरी, कडबा, मका या पिकांची लागवड केली होती. मात्र गव्यांनी त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भातशेतीच्या जवळच असलेल्या जंगलात हा गवारेड्यांचा कळप वास्तव्यास आहे. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेत तातडीने गव्याचा बंदोबस्त करावा आणि नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी येथील तेंडोलकर यांनी केली आहे.