कल्याण : काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीजवळील एका मंदिरांत मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहे, कल्याणातील सामाजिक संस्थांनी एकत्रित येत श्रद्धांजली सभा घेऊन या घटनेचा निषेध केला. या सभेत तीन ठराव करण्यात आले असून, हे ठराव तहसीलदारां मार्फत राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या घटनेतील आरोपी मिश्रा, पांडे आणि शर्मा यांना फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.
कल्याण विकासिनी आणि सर्वात्मका सामाजिक संघटना आणि कल्याणातील विविध संघटनांच्या वतीने कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सभेत माजी आमदार आप्पासाहेब शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड , संजय निरभवने, बि.जी.गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, विजय मोरे, आशाताई तिरपुडे ,मीनाक्षीताई आहेर, मनोज नायर, रमेश केदारे, राधिकाताई गुप्ते, राकेश गायकावाड, अनिल तिवारी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहताना, मंदिराचे पावित्र पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटक असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
माजी आमदार आप्पा शिंदे म्हणाले, देऊळ असो की कोणत्याही धर्माचं प्रार्थनास्थळ, यामध्ये राहणारे, पुजारी धर्मगुरू, यांचे पोलीस वेरिफिकेशन असले पाहिजे असा महत्त्वाचा मुद्दा मांडला. तसेच कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन, ज्याठिकाणी अवैध धंदे, नशा केंद्र चालतात त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या घटनेचा निषेध करीत आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, असे मत मांडले त्याचबरोबर येत्या 28 जुलै रोजी आगरी बांधव मोठ्या संख्येने एकत्रित येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
माजी नगरसेवक हर्षवर्धन पलांडे यांनीही श्रद्धांजली वाहताना या आरोपींना लवकरात लवकर फास्टट्रॅकवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मत मांडले.
सामाजिक कार्यकर्ते रमेश केदारे यांनी सुद्धा त्यांचे मत मांडताना, गावागावातील धार्मिक लोकांनी आपल्या भागातील मंदिराची, पार्थना स्थळांची व्यवस्था पाहावी, परप्रांतीय लोकांना नेमू नये असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्र संचालन माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी केले. रसाळ म्हणाले, ज्या आरोपींनी कृत्य केलं, त्यांनी, संगनमताने षडयंत्र करून केले आहे, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मंदिरामध्ये, किंवा कोणत्याही धार्मिक स्थळात आपण इतक्या पवित्र्याने जातो किमान मंदिरासारख्या ठिकाणी, आपल्या डोक्यात, वाईट विचार येत नाहीत परंतु हे पुजारी म्हणून घेणाऱ्या लोकांनी, नुसतं मंदिराच्या पावित्रच भंग केले नाही, तर लोकांच्या प्रार्थना स्थळाबद्दल असलेल्या भावना सुद्धा भंग केले आहे. तसेच महिलांसाठी WCR असावे म्हणजे वुमन कॉमन रूम हा कन्सेप्ट प्रत्येक भागात राबवला पाहिजे अशी सूचना केली.
या सभेची संपूर्ण व्यवस्था, संजय निरभवने आणि त्यांचे सहकारी, तसेच राकेश गायकवाड, अनिमेश श्रीवास्तव, अजित शिंदे यांनी केली.
काय केले ठराव …
1) सामूहिक बलात्कार करणाऱ्या, आणि हत्या करणाऱ्या आरोपी, मिश्रा, पांडे, आणि शर्मा या तिघांना जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
2) प्रत्येक विभागात, WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या / शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत, ज्यात स्वच्छ, सुशोभीत हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंगिंग रूम , टॉयलेट ची सोय, TV , एखादी पोलिस कॉन्स्टेबल असेल अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. कौटुंबीक कलह झालाच तर त्यातून मध्ये जाऊन थोडा वेळ घालवता येईल, जीवाचे बर वाईट करण्याची मानसिकता बदलू शकते, बाहेर कुठे गेल्याने दुष्ट लोकांच्या हाती सापडण्याची भीती कमी होईल.
3) पोलिस शांतता कमिटी च्या बैठका नियमित घेण्यात याव्यात. हल्ली पोलिसांकडून शांतता कमिटी च्या बैठका होताना दिसत नाहीत, त्यामुळे अनेक सुरक्षा संदर्भात समस्या महिलांना मांडता येत नाहीत. त्यामुळे अशा बैठका लावल्या जाव्यात.याबाबत पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांच्या सोबत मा.आप्पा शिंदे यांनी पुढाकार घेऊन बैठक लावावी.
******