पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन

मुंबई, दि. ३ :– राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे.

पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” उपलब्ध करुन देणार आहेत. पालकमंत्री चव्हाण यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन आरोग्य केंद्रामध्ये हे अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स उपलब्ध होणार आहेत. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९.३० वा. कुडाळ येथील माणगावं प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तसेच ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता सावंतवाडी मधील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुविधा केंद्र येथे होणार आहे.

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड येथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील गरजू जनतेला वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मोफत व तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरुन गरजू रुग्णांना मिळणारे उपचार अधिक जलदगतीने होण्यास त्याची मदत होईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे संस्थापक सीईओ समीर सावरकर व संस्थापक सीओओ राजीव कुमार असून दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे माजी विद्यार्थी आहेत. समीर हे अशोका फेलो देखील आहेत. न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही ISO13485-2016 आणि CE प्रमाणित, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उत्पादनांसह स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी डिजिटल हेल्थकेअर कंपनी असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) मान्यताप्राप्त अशी न्यूरोसिनॅप्टिकची R&D लॅब आहे. कंपनीने “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे उपकरण तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग ( BIRAC ) ह्यांच्या सहकार्याने आविष्कृत केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णतः भारतीय तंत्रज्ञान वापरून “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” विकसित केले आहे.

न्यूरोसिनॅप्टीक गेली अनेक वर्षे ई-हेल्थ व एम-हेल्थ टेक्नोलॉजी सोल्युशन्स या क्षेत्रात काम करत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखून खाजगी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच परदेशातही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून कंपनी तर्फे याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” हे भारतातील विविध राज्यांमध्ये उपलब्ध असून आजतागायत देशभरातील सुमारे २७०० ग्रामीण केंद्रात सदर सुविधा स्थापन करुन दिलेली आहे.

न्यूरोसिनॅप्टिक कम्युनिकेशन्सला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता प्राप्त आहेत ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा “टेक्नॉलॉजी पायोनियर”, नॅसकॉम फाउंडेशनचा “ज्यूरीज स्पेशल चॉईस” आणि नुकताच मिळालेला ” रेड हॅरींग ग्लोबल टॉप १०० कंपनीज” असे प्रतिष्ठित पुरस्कार समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रातील न्यूरोसिनॅप्टीक ही एकमेव भारतीय कंपनी आहे जीचा गौरव “टाईम मॅगझिन”ने केला आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांनी उदघाटन करून राष्ट्राला समर्पित केलेले हे “रेमिडी नोवा सोल्युशन्स किट” आता महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अतिशय सोयीचे आणि लाभदायक ठरणार आहे असे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!