ठाणे (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकानजीक सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने अंबरनाथपर्यंत लोकल थांबविण्यात आल्या. त्यामुळे कर्जत खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली संध्याकाळी चारच्या सुमारास हा प्रकार घडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मध्ये रेल्वे उशिराने धावत असतानाच बुधवारी बदलापूर स्थानकावर चुकीचा सिग्नल मिळाल्याने मालगाडी वेगळ्या रुळावर गेली. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. बदलापूर स्थानकावर लोकल गाड्या उभ्या असून खोपोलीकडे जाणाऱ्या सर्व लोकल अंबरनाथपर्यंत थांबविण्यात आल्या. कल्याणपासून ते अंबरनाथ पर्यंत लोकल सेवा रडतखडत सुरु होती. बदलापूर, कर्जत, खोपोलीपर्यंतचे प्रवासी मुंबईच्या दिशेने नोकरीनिमित्त येत असतात. बदलापूर स्थानकात लोकल अडकून पडल्याने अंबरनाथपर्यंत लोकल फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंबरनाथच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.अंबरनाथ रेल्वे स्थानकात प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. अपरिहार्य कारणांमुळे, SE मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या सर्व डाऊन मार्गावर लोकल अंबरनाथपर्यंत धावतील आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यास सुटतील”, अशी उद्घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात येत होती. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती नंतर मालगाडी रवाना झाली.
डोंबिवली ते अंबरनाथ २० मिनिटाच्या प्रवासाला दीड तास
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबई सीएसटीहुन बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात आल्या. डोंबिवली ते अंबरनाथ हे अंतर २१ मिनिटे असताना या प्रवासाला तब्बल दीड तास लागले. डोंबिवलीहून चार वाजून २१ मिनिटांची बदलापूर लोकल अंबरनाथला तब्बल दि ड तासाने पोहचली. कल्याण ते उल्हासनगर दरम्यान एका मागोमाग लोकल उभ्या होत्या. उल्हासनगर रेल्वे स्थानकानंतर खूप वेळ लोकल थांबून राहिल्याने प्रवाश्यांची रेल्वे रुळावरून पायपीट करीत अंबरनाथ स्टेशन गाठले.
*****