ठाणे : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम 23 डिसेंबर, 2024 ते 3 जानेवारी, 2025 या कालावधीत राबवण्यात येणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. आशा सेविकांमार्फत ग्रामीण भागातील सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले.
“टीबी हारेगा, देश जितेगा” ही संकल्पना राबवण्यासाठी 95 गटामार्फत क्षयरोगाचे निदान होण्यापासून अद्यापही वंचित असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हा क्षयरोग अधिकारी अलका परगे यांनी सविस्तर माहिती दिली. निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. मृणाली राहुड, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटिल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग साई होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय दुगाड फाटा दाभाड भिवंडी चे प्राध्यापक डॉ. अर्चना कोटलवार , बी. आर. हारणे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय चे प्राध्यापक डॉ. तेजस मोरे तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.