ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या मालमत्ता करआकारणी संदर्भात प्राप्त झालेल्या अर्जांचा व प्रलंबित असलेल्या कामाचा निपटारा तातडीने व्हावा तसेच मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ व्हावी यासाठी प्रभागसमितीनिहाय दर शनिवारी ‘टॅक्स अदालत आयोजित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला असून टॅक्स अदालती दरम्यान प्रलंबित प्रकरणांचा आढावा दर सोमवारी ते स्वत: घेणार आहेत.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील 9 प्रभागसमितीअंतर्गत मालमत्ता करासंबंधी आलेल्या अर्ज निकाली काढण्याच्या दृष्टीने या अदालतीचे आयोजन करण्यात आहे. दर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी एक याप्रमाणे दर शनिवारी होणाऱ्या टॅक्स अदालतीत प्रत्येक प्रभागसमितीतील प्रलंबित अर्जावर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून दर सोमवारी याबाबतचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा घेणार आहेत. या टॅक्स अदालतीमध्ये मालमत्ता करासंबंधी असलेल्या अडचणी दूर होऊन नागरिकांना नवीन कर आकारणी, वाढीव बांधकामाला कर लावणे, हस्तांतरण आदी कामे मार्गी लागणार असल्याने कर भरण्याचा मार्ग मोकळा होणार असून यामुळे मालमत्ता कराचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. अनेक दिवस अर्ज देवूनही त्यावर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाली असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.