राजापूरमध्ये तावडे अतिथी भवनाचे शानदार उद्घाटन : युवा मंडळाने समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे : विनोद तावडे
मुंबई – क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथी भवन सारखी दिव्य भव्यवास्तू आज दिमाखात उभी राहीली. भविष्यात तावडे मंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्या युवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या या मंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत न राहता या युवा मंडळाने आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
क्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष असून क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडीवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदारपणे पार पडला. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार बाळ माने, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळचे अध्यक्ष दिनकर तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार शंकरराव तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे , उपाध्यक्ष राजेंद्र तावडे, अतिथी भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्रिवेणी संगम आणि तावडे समाजाचा आठशे वर्षाचा इतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजार चौ.फूट. बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, सुंदर उद्यान सांस्कृतिक व सामाजिक केंद्र इत्यादी सुविधा आहेत. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांना एक पर्वणी ठरणारआहे. तसेच यापुढे ही वास्तू सर्वांसाठी मार्केट दराने तर तावडे बंधूंसाठी माफक दारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे तावडे हितवर्धक मंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले. तावडे हितवर्धक मंडळाच्या मार्फत युवकांनी आता पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे यावे आणि उद्देशाने नवीन उद्योगाजकाना पुढे आणण्यासाठी तावडे मंडळ प्रयत्नशील असेल व आपला प्रसार आणि आपले कार्य युवकांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उमटवावे, अशा शुभेच्छा तावडे यांनी याप्रसंगी दिल्या. ही वास्तू म्हणजे एक आजच्या युवकांसाठी आदर्श आहे.तावडे कुटुंबियांनीही आपल्या घरातील प्रत्येक शुभकार्य या तावडे अतिथी भवनात साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच ही वास्तुचा दिमाखदारपणा जास्तीत लोकापर्यंत पोहचिविण्याच्या दृष्टीने या वास्तुचे चांगल्या पध्दतीने मार्केटिंग करुन जास्तीत जास्त लोक या ठिकाणी कसे पोहचतील याचा विचार करावा असेही विनोद तावडे यांनी सांगितले. याप्रसंगी सतीश तावडे यांनी प्रास्तिवक केले. तर खासदार राऊत , आमदार जाधव यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. तर आर्किटेक्ट संतोष तावडे व अध्यक्ष दिनकर तावडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी क्षत्रिय मराठा तावडेहितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
**