मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाच्या ७ मंत्र्यांनी सोमवारी या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली. गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे गंभीर आरोप करणे चुकीचं आहे, असं मत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी फडणवीसांकडे मांडलं. तसेच गणपत गायकवाड यांच्यावर पक्षाकडून योग्य ती कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे तथ्यहीन, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही, असे आरोप केले. या आरोपांबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं आहे. हे चुकीचं आहे. त्याअनुषंगाने भाजप पक्षाने योग्य ती कारवाई करावी, असं मत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

‘समन्वय समितीच्या नियमित बैठका होतील’

“समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात. मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणास्तव होऊ शकलेल्या नाहीत. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बसतील. नियमित समन्वय समितीच्या बैठका कशाप्रकारे घ्याव्यात याबाबतचं पुढचं सगळं धोरण ठरवतील. त्याप्रमाणे ते समन्वय समितीला कळवतील. त्यामुळे समन्वय समितीच्या यापुढे नियमित बैठका होतील”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!