ठाणे : कोरोना सारख्या महामारीने जगात थैमान घातले असून बेरोजगारीचे सावट असताना केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा ठाणे जिल्ह्यातील गर्भवती मातांना आधार ठरला आहे. या योजने अंतर्गत ०१ जानेवारी, २०१७ पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे १ लाख १६ हजार ६०८ गर्भवती मातांना ४४ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये इतका लाभ देण्यात आला आहे. या योजनेत जास्तीत जास्त महिलांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा राबत आहे. जिल्ह्यातील गरोदर महिलांचे आरोग्य चांगले राहून होणाऱ्या बाळाचेही आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना महत्त्वपूर्ण आहे. या योजनेच्या माध्यमातून मातेला वंदन करण्याचे कामच शासनाकडून होत आहे.


माता सुदृढ राहिली तर जन्माला येणारी देशाची भावी पिढी सुदृढ राहते. त्यामुळे गरोदर महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा विविध कारणांमुळे गरोदर महिलेला सकस आहार मिळत नाही. गरोदरपणात अनेक महिलांना शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी करावी लागते. त्याचा परिमाण तिच्या व होणाऱ्या बालकाच्या आरोग्यावर होतो. अशा महिलांना मदत व्हावी, तिचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेत नवीन लाभार्थ्यांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, गरजू मातेपर्यंत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवा विभागाच्या वतीने १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या काळात ‘मातृवंदना सप्ताह’ राबविण्यात येत आहे.

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा असा या योजनेचा उद्देश आहे. गरोदर काळात माता, त्यानंतर शिशु सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व मातेला सकस आहार घेता यावा तसेच कुपोषणावर मात करता यावी व काम करणाऱ्या महिलेला अंशत: बुडीत मजुरी मिळावी यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे वरील सर्व बाबींमध्ये गर्भवती मातांना मदत झाली असून ही योजना गर्भवती महिलांकरीता वरदान ठरली आहे.

योजनेचे पात्रता निकष
पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा किंवा प्रसुती दि. १ जानेवारी २०१७ रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशा महिला. या महिलांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असावी. कुटुंबातील केवळ पहिल्या जिवीत अपत्यासाठी लाभ मिळेल. पहिल्या खेपेच्या गरोदर व स्तनदा मातांना हा लाभ अनुज्ञेय आहे. मात्र, ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत अशा मातांना हा लाभ घेता येणार नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील त्यानांही हा लाभ मिळणार नाही.

असा मिळतो लाभ

या योजनेअंर्गत दि.१ जानेवारी २०१७ रोजी किंवा तद्नंतर पहिल्यांदा प्रसुती झालेली माता किंवा गर्भधारणा झालेल्या महिलांना तीन टप्प्यात पाच हजार रुपयांची रक्कम लाभ म्हणून दिली जाते. पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गरोदरपणाची नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपये दिले जाते. तर किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार रुपये लाभ दिला जातो. तिसऱ्या हप्त्याची २ हजार रुपयांची रक्कम प्रसुतीनंतर अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हिपाटायटीस बी व त्या अनुषांगिक लसीकरणाचा पहिला पूरक खुराक दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता गरोदर मातेचे आधार कार्ड, तिच्या पतीचे आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट खाते इत्यादी बाबींची आवश्यकता आहे. आपल्या निकट असलेल्या आशाताई, एएनएम ताई व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून या योजनेसाठी लागणारे आवश्यक दस्ताऐवज देऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मातृवंदना सप्ताह
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा, यासाठी जिल्हा आरोग्य सेवेच्या वतीने १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर याकालावधीत मातृवंदन सप्ताह सुरु करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी या सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या सप्ताहामध्ये नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच नुक्कड नाटक, योजनेविषयी माहिती देणाऱ्या सभा, मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, नाविन्यपूर्ण प्रसार आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच योजनेचा प्रसार व्हावा, यासाठी जिल्ह्यांमध्ये ग्रामसभा घेणे, स्थानिक स्वराज संस्थांच्या बैठका घेणे, माहिती पत्रकांचे वाटप करणे, पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी गृहभेटी आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार बलभीम वाघमारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!