पदपथ अडविणा-या दुकानदारांविरोधात कारवाई करा : केडीएमसी आयुक्तांचे अधिका- यांना आदेश
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला असतानाच, आता महापालिका प्रशासनाने पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी आज बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक बैठकीत नागरिकांना चालणे-फिरणे सोपे जाण्याच्या दृष्टीने पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्याचे सक्त आदेश प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी फेरीवाला हटाव मोहीम प्रभावीपणे राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
आयुक्त वेलरासू यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी फेरीवाल्यां संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी प्रभावीपणे कारवाई करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच नागरिकांना चालणे-फिरणे सोपे जाण्याच्या दृष्टीने पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्याचे निर्देश प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना देत वेलरासू यांनी, ज्या दुकानदार अथवा गाळेधारकांनी पदपथ काबीज केले आहेत त्यांनी स्वत:हून ही अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा महापालिकेकडून ती हटविण्यात येतील व त्याचा खर्च सबंधित व्यावसायिकाकडून वसूल करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, महापालिकेकडे हस्तांतरित झालेले व आरक्षित असलेले भूखंडांची माहिती नगररचना विभागाने प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना द्यावी व त्यानुसार ज्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहेत ते नोव्हेंबर अखेर मोकळे करावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले. यावेळी करवसुलीचा आढावा घेत मालमत्ता कराची थकबाकी प्रलंबित असलेल्या थकबाकीदारांकडून तसेच ज्या मोबाईल कंपन्यांनी थकीत कराची रक्कम महापालिकेकडे भरणा केलेली नाही अशा मालमत्ताधारकांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश कर निर्धारक व संकलक अनिल लाड यांना देत मालमत्ता कारच्या वसुलीबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचनाही वेलरासू यांनी केली.