स्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर
महाराष्ट्र ठरले पहिले राज्य
– आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान स्वाईन फ्लूमुळे 268 जणांचा मृत्यू झाला असून 32 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर प्राधान्याने करावयाच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वांचे (प्रोटोकॉल) प्रकाशन आज आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले. अशाप्रकारे उपचाराबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना ही मार्गदर्शक तत्वे पाठविण्यात येणार असून त्यानुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
राज्यात नाशिक, पुणे, सातारा यासह अन्य भागात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने आरोग्यमंत्र्यांनी साथरोग नियंत्रण समितीची बैठक बोलविली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, संचालक डॉ. संजीव कांबळे उपस्थित होते. स्वाईन फ्लूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन राज्य सरकारने त्याची गांभीर्यानं दखल घेतली असून गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षात घेता अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचार कसे करावेत, यावर भर देत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांवर या मार्गदर्शनानुसार उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली असून स्वाईन फ्लूच्या गंभीर रुग्णासाठी फायदेशीर ठरणाऱ्या उपचारांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे रुग्णावर उपचार करताना त्यानुसार डॉक्टरांनी या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करून उपचार करावेत. अतिदक्षता विभागातील रुग्णाला नेमकं कसं हाताळावं याबाबत स्पष्टता असावी, यासाठी ही मार्गदर्शक तत्वे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. खासगी रुग्णालये, महापालिकांची रुग्णालये तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य या सर्वांना या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे वितरण करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात सध्या स्वाईन फ्लूची लागण झालेले सुमारे 2300 रुग्ण आहेत. त्या पाठोपाठ डेंग्यूची सुमारे 6 हजार 900 रुग्ण आहेत. या वर्षी स्वाईन फ्लूचे 60 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील असून स्वाईन फ्लूमुळे 41 ते 50 या वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्दी, ताप या आजाराच्या रुग्णांना औषधोपचारानंतर 24 तासांच्या आत प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर टॅमीफ्लूच्या गोळ्या त्यांना तातडीने सुरु कराव्यात, असे आवाहन राज्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना करण्यात आले आहे. विलंबाने उपचार होत असल्याने स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. टॅमीफ्लूच्या गोळीचा दुष्परिणाम जाणवत नसून खासगी डॉक्टरांनी तिचा वापर करावा. या सोबतच नेमक्या कोणत्या तापमानात स्वाईन फ्लूचे विषाणू वाढतात याचा देखील अभ्यास करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
डेंग्यूमुळे या वर्षी आतापर्यंत सुमारे 29 मृत्यू झाले असून राज्यातील पर्यटनस्थळे, बसस्थानके अशा सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. अशा ठिकाणी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकांनी तातडीने हाती घ्याव्यात, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
असा आहे स्वाईन फ्लू उपचाराचा प्रोटोकॉल
· स्वाईन फ्लूच्या रुग्णांची अ, ब, क अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे.
· अ भागात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची विभागणी
· ब भागात प्रौढांवर स्वाईन फ्लूचे उपचार
· क भागात लहान मुलांवर स्वाईन फ्लूचे उपचार अशी विभागणी आहे.
· भाग A स्वाईन फ्लूच्या रुग्णांची विभागणी
भाग अ चे रुग्ण
· सौम्य स्वरूपाचा ताप आणि घशाची समस्या या व अन्य आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांना औषधोपचारानंतर २४ ते ४८ तासांत सुधारणा न झाल्यास त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने टॅमीफ्लू द्यावी.
· या रुग्णांना चाचणी करण्याची गरज नाही.
· रुग्णांना घरी आराम करण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच सल्ला द्यावा.
भाग ब चे रुग्ण
· जास्त ताप आणि घशाची तीव्र समस्या जाणवत असेल तर अशा रुग्णांना ऑसेलटॅमिवीर द्यावं आणि त्यांना घरी आराम करण्याचा सल्ला द्यावा.
· सौम्य स्वरूपाचा आजार असलेली लहान मुलं, गरोदर महिला आणि 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना स्वाईन फ्लूचं औषध द्यावं
· हृदय, किडनी, फुफ्फुस, यकृताचा आजार, मधुमेह, कॅन्सर, एड्स असल्यास त्यांना स्वाईन फ्लूचं औषध द्यावे.
· स्वाईन फ्लू चाचणी करण्याची गरज नाही.
· या रुग्णांना घरी आराम करण्याचा आणि गर्दीत न जाण्याचा सल्ला द्यावा.
भाग क चे रुग्ण
· भाग अ आणि ब च्या रुग्णांमध्ये वरील लक्षणांव्यरिक्त खाली नमूद केलेली लक्षणं आढळल्यास ती गंभीर समजावीत आणि या रुग्णांच्या त्वरित चाचण्या करून त्यांना रुग्णालयात दाखल करावं.
· श्वास घेण्यात अडथळे, छातीत दुखणं, रक्तदाब कमी होणं, नखांचा रंग बदलणे.
· लहान मुलांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसल्यास. (जास्त झोपणं, जास्त आणि सतत येणारा ताप, आळस, श्वास घेण्यात अडथळे)
अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यासंदर्भात सविस्तर सूचना देखील या मार्गदर्शक तत्वात देण्यात आल्या आहेत.