रोटरी ग्रामीण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवली : दिवाळीचा सण घराघरात आनंदात साजरा केला जातो. तथापी दुर्गम भागात आदिवासी पाड्यांत राहणाऱ्या गरजू आणि गरजू या सणाच्या आनंदापासून वंचित राहतात. अशा वंचितांनाही या सणाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने रोटरी ग्रामीण मंडळाने सालाबाद प्रमाणे यंदाही शहरांपासून दूर असलेल्या दुर्गम भागात जाऊन तेथील आदिवासींसह दिवाळी साजरी केली.
रोटरी ग्रामीण मंडळ (भोपर) चे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दुर्गम आदिवासी भागातल्या देवळोली पाड्यातील जिल्हा परिषदेची त्यासाठी शाळा निवडली होती. कान्हेरवाडी, सावरेवाडी, रंदगाव, कोल्हावाडी, पातलपाडा, कातकरवाडी, एटराव, शिळ, आदी वाड्या वस्त्यांतून आलेल्या तब्बल 800 आदिवासी बांधवांना साड्या, मिठाई, फराळाचे वाटप करण्यात आले. यात 700 महिला आणि 100 पुरूष मंडळींचा समावेश होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह बाजार समितीचे सभापती उज्वल देशमुख, रो. ज्योती पाटील, सरपंच रंजना डबरे, नरेंद्र पाटील, खिमाराम चौधरी, शांत कुलकर्णी, अस्लम सरगुरोह, अघईचे केंद्र प्रमुख बाळकृष्ण बांगर, पिंपळासच्या माजी सरपंच नागूबाई माळी, अवधूत पिसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हभप गजानन महाराज भोपी यांच्या भजन संध्याने तर उपस्थितांमध्ये भावभक्तीचा मळा फुलला होता. कल्याण सागरच्या मिमिक्रिने हास्यकल्लोळ केला होता.
सरसकट सर्व आदिवासींना घरकुले
रोटरी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्थानिक विषयाला हात घातला. आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. इतकेच काय तर घरकुल योजना शहरी भागात राबवल्या जातात. मात्र आदिवासी बांधव या योजनेपासून वंचित कसे राहतात ? या रो. पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित आमदार किसन कथोरे यांनी दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक आदिवासी बांधवांना त्यांची हक्काची घरकुले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही दिली. शासनाच्या योजना समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष देत असतो. आदिवासींचा विकास हाच माझा ध्यास असल्याचेही आमदार कथोरे म्हणाले.