ठाणे, दि. ८ : शहरातील खड्ड्यांमुळे दोन नागरीकांचा बळी व दररोजच्या वाहतूककोंडीमुळे लाखो नागरीकांच्या हालाला जबाबदार ठरलेल्या कंत्राटदाराला महापालिकेने केवळ १० लाख रुपये दंड ठोठावला. गुणवत्तापूर्ण काम न केल्याचा ठपका ठेवतानाच कंत्राटदाराची काळ्या यादीत टाकण्याऐवजी दंडावर सुटका करण्यात आलीय, अशी टीका भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे हात कोणी बांधले होते, असा सवालही त्यांनी केलाय.

ठाणे शहरातील १० प्रभाग समितीत पावसाळ्यातील खड्ड्यांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या कामाचे कंत्राट मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, संबंधित कंपनीला कार्यादेश देण्यातच सप्टेंबरपर्यंत उशीर झाल्याची चर्चा होती. मात्र, त्याआधीच कंपनीने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले होते. परंतु, त्याचे गुणवत्ता नियंत्रण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना करता आले नव्हते. तर रस्त्यावरील खड्ड्यात केवळ रेती व खडी वापरण्यात आले असल्याचे भाजपाच्या पाहणी दौऱ्यात उघड झाले होते.

चोर सोडून संन्याशाला फाशी …
महापालिकेच्या अनास्थेमुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांत वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरीकांचे हाल झाले होते. या प्रकरणी जबाबदार धरून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता होती. मात्र, महापालिका प्रशासनाने काळ्या यादीऐवजी केवळ १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर जुजबी दंड आकारणी ही मेहेरनजरच आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली आहे. तर चार अभियंत्यांच्या निलंबनातून चोराऐवजी संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार घडला आहे, असेही ते म्हणाले.

निविदेचा सविस्तर तपशील जाहीर करा

महापालिकेच्या प्रशासनाकडून खड्डे भरण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत गांभीर्याने कार्यवाही केली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या निविदेचा तपशील जाहीर करावा. खड्डे भरण्याच्या कामाची कोणी पाहणी केली होती, त्याचे गुणवत्ता नियंत्रण कोणी केली होते, याबाबत ठाणेकरांना माहिती द्यावी. त्यामुळे आपल्या हालाला जबाबदार कोण होते, याची माहिती नागरीकांना समजू शकेल, अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे.

रस्ते व पुलावरील खड्डयांची जबाबदारी कोणाची ?

राज्याच्या अखत्यारीतील एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि मेट्रो प्राधिकरणामुळे रस्ते व पुलांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची? घोडबंदर रोडवर होणाऱ्या कोंडीला जबाबदार कोण? त्याबद्दल कोणाला दोषी धरणार, असा सवालही डुंबरे यांनी केला. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे कामही मे. बिटकॅान इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले होते का, असा टोला डुंबरे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!