जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते. लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जखमी रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावे. लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाने ५७ मोर्चे काढले. पण, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा बघाल, असा अर्थ होत नाही. सर्व पक्षांनी विशिष्ट समाजाला घेऊन राजकारण केलं. मात्र, सर्वांत मोठ्या मराठा समाजाकडं दुर्लक्ष केलं. अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.
अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का मिळत नाही ? गायकवाड कमिशनमध्ये थोड्याफार चुका होत्या. त्यात दुरूस्ती करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं. मी सर्वांना आवाहन करतो. आपल्याला शांततेन आंदोलन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पाईक आहोत. मराठा समाजाला न्याय मिळत नसेल, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही,” असं उदयनराजे म्हणाले.