मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घराणेशाहीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील इतर नेत्यावर टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा राजकारणात येतो आणि खासदार होतो. जर मुख्यमंत्री लोकांचा विचार करणारे असतील तर मग ठाण्यात सर्व लोक नालायक आहेत का ?. कुणाचीच खासदारकीला निवडून येण्याची लायकी नाही का? मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंच केवळ राजकारणासाठी सक्षम आहेत का ? असा खोचक सवाल अंधारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या ट्विटला अंधारे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटची भाषा ही भाजपच्या नेत्याची असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रीप्ट रायटरने हे ट्विट लिहून दिले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतात कधीपासून 2 हेलीपॅड दिसायला लागले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था इतकी चांगली कधीपासून झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ज्या वेल्हे गावात राहतात त्या गावात साधे नीट रस्ते नाहीत. मुख्यमंत्रयाचा मुलगा खासदार होतो. रामदास कदम यांचा मुलगा राजकारणात येतो आणि आमदार होतो, भारत गोगावलेंचा मुलगा राजकारणात सक्रीय होतो, यांच्या कुणाचाही मतदारसंघात दुसरे कुणी राजकारण करण्यास सक्षम नाही का ? असा खोचक सवाल अंधारे यांनी उपस्थित करत ४० पैकी १५ आमदारांनी जवळपास आपल्या पुढील पिढीला पुढे केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतल्यानंतर जी नवीन रचना तयार करत आहे, त्यावर सर्व याच्यासोबत असलेल्यांची पुढील पिढी असल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे.

अंधारे म्हणाल्या की, केवळ कुटुंबापुराता हपालेला चष्मा घालून फिरणारी माणसे यांना धनसेवा हीच ईश्वर सेवा वाटते हे वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरश्यासमोर उभे राहत म्हटले आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वकूब असणारी माणसे जसे नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकांरी चालू शकतात, तसेच प्रबोधनकार ठाकरे हे प्रचंड वकुबाचे नाव होते, तर प्रबोधनकार ठाकरेंच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे वकुबाचे नाव होते. ठाकरे घरण्यातील चौथी पिढी म्हणून आदित्य ठाकरे हे सुद्धा वकुब सिद्ध करत आहेत. मी जात, धर्म लिंग या सर्वच उपेक्षित स्तरातून आली आहे. मी सर्वासामान्य कुटुंबातील आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे. मला केवळ माझ्या कामामुळे संधी देण्यात आली आहे, हे केवळ शिवसेनेत होऊ शकते. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मेलोड्रामा करत आहे, असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

One thought on “<em>घराणेशाहीवरून सुषमा अंधारेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र</em>”
  1. डोकटर आनंद हर्डीकर. डोमबिवली.पू. says:

    मुख्य मंत्री बैल गाडीतून यायला हवे काय?
    की त्यानी केबीन मधून बटणे दाबून काम करावे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!