पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि सुप्रीया सुळे या बहीण भावातला अबोला दिसून येत आहे. रविवारी पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटना कार्यक्रमातही सुळेंनी अजित पवारांकडे बघण्याचे देखील टाळले. मात्र शुक्रवारी एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या पत्नी भावजय सुनेत्रा पवार यांची गळाभेट घेतली होती. त्यामुळे बहिण भावाचा दुरावा पण भावजयशी गळाभेट असा प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.
पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार म्हणून सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. दोघेही एकाच व्यासपीठावर होते. मात्र दोघांच्या मधल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. सुप्रिया सुळे या फडणवीसांशी गपा मारताना दिसून आल्या. मात्र सुप्रिया सुळे अजित पवारांनी एकमेकांकडे बघण्याचे देखील टाळले. बहीण, भावातला हा दुरावा आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पुढाकारानं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं.
बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उमेदवार असतील असे सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद भावजय असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांनी माध्यमांनाच बजावले
बहीण – भावातील अबोल्याबाबत अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, माध्यमांना बातमीसाठी काही विषय नसतील तर ते असे इतर प्रश्नांकडे लक्ष देत बसतात. तुम्ही मुद्द्याचे प्रश्न विचारणार असाल तर मी उत्तर देतो, असे स्पष्ट शब्दात बजावले. मात्र सुप्रिया सुळेंशी संवाद का साधला नाही? याबाबत उत्तर देणे टाळले.
सुप्रिया सुळेंनी दिलं हे उत्तर
भावजयीची गळाभेट घेता, पण भावासोबत अबोला आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर बोलण्याची संधीच मिळाली नाही, असं उत्तर सुळेंनी दिलं. अजित पवार, देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उशिरा आले. मी तर आधीच येऊन बसले होते. पण ते उशिरा आले आणि लवकर गेले. त्यामुळे बोलण्याची संधीच मिळाली नाही, असं सुळे म्हणाल्या. मी कार्यक्रमाला आधीच आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला. दादा कार्यक्रमाला उशिरा आले. मग त्यांना विमानतळावर जायचं होतं. कदाचित त्यांची घाई गडबड असेल. त्यांना विमानतळाच्या टर्मिनलच्या उद्घाटनाला जायचं होतं. त्यामुळे घाई असू शकते. ते बिझी लोक आहेत, असं सुळे यांनी म्हटलं.