ठाणे : सुपर मॅक्स कंपनी कामगारांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, येत्या ४ जानेवारीला वर्षावर बैठक बोलाविण्यात आली आहे. कंपनी सुरू करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी कामगारांच्या शिष्ट मंडळाला दिले. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनी बंद असल्याने कामगारांना दीड वर्षापासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांची परिस्थिती बिकट झाली आहे. लवकरात लवकर सुरू करावी, कामगारांचा थकीत पगार मिळावा यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या कामगारांनी या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांच्या पुढाकाराने कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते. कामगारांनी आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी कामगारांना धीर देत सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. कंपनीचे दोन मालक मालक रॉकी मल्होत्रा आणि ॲक्टीस यांच्यात कायदेविषयक वाद असल्याने कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागत आहे. जर मल्होत्रा कंपनी सुरू करण्यासाठी तयार असतील तर आपण लवकरात लवकर त्यांच्या सोबत संयुक्त बैठक बोलावून कंपनी सुरू करण्याआधी विचारणा केली जाईल यासाठी चार जानेवारी रोजी वर्षावर बैठक आयोजित केली जाईल कंपनी सुरू करण्यासाठी राज्य सरकार त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
जर दोन्ही कंपनी मालक कंपनी सुरू करण्यासाठी चालढकल करत असतील तर कामगारांना थकीत पगार आणि योग्य तो नुकसान भरपाई हिशोब देण्यात यावा अशी विनंती कामगार प्रतिनिधीनी मुख्यमंत्र्यांना केली.
स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले म्हणाल्या की, सध्या कामगारांना जगण्यासाठी कमीत कमी दोन पगार देण्यात यावेत व लंडन मधील कोर्टात झालेले दावे दाखवून व्यवस्थापन याच्यातुन सुटु पाहत आहे. जर तसे असेल तर तात्काळ त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी. तसेच कामगार प्रतिनिधीनी NCLT केसेस मधे सरकारने कामगारांच्या वतीने पार्टी होऊन NCLT कोर्टात कामगारांची बाजू मांडावी. यासंबंधीचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी कामगार प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल यांना दिले आहेत.