मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभालीसाठी उद्या रविवार ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मात्र सदर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांवरच थांबणार आहेत.
हार्बर मार्ग सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल दिशेने जाणाऱ्या डाउन मार्गावरील गाड्या आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी जणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील गाड्या बंद असणार आहेत.
तसेच ब्लॉक काळात पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र ८) दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रवासास मुभा असणार आहे.
पश्चिम रेल्वेही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुज ते जोगेश्वरी दरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत पर्यंत ब्लॉक असणार आहे.