आगामी 31 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश
‘कॅश फॉर क्वेश्चन’ प्रकरणी आचार समितीची कारवाई
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : संसदेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना चौकशीला हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय. महुआ मोईत्रांवर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आचार समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार महुआ मोईत्रांना आगामी 31 ऑक्टोबर रोजी चौकशीला हजर राहण्यास बजावले आहे.
भाजप नेते निशिकांत दुबे यांच्या तक्रारीची सुनावणी करणाऱ्या आचार समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोदकुमार सोनकर आहेत. व्ही.डी.शर्मा, सुमेधानंद सरस्वती, अपराजिता सारंगी, डॉ. राजदीप रॉय, सुनीता दुग्गल आणि सुभाष भामरे हे समितीचे सदस्य आहेत. काँग्रेसकडून या समितीत व्ही वैथिलिंगम, एन उत्तम कुमार रेड्डी, बालासोर वल्लभनेनी आणि प्रणीत कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे हेमंत गोडसे, जेडीयूचे गिरीधारी यादव, सीपीआय (एम)चे पीआर नटराजन आणि बसपचे दानिश अली यांचा समावेश आहे.
आचार समितीचे अध्यक्ष खासदार विनोद सोनकर यांनी सांगितले की, निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहादराय या दोघांना समन्स पाठवण्यात आले होते, दोघांनीही हजर राहून आपले म्हणणे मांडले. यानंतर 31 ऑक्टोबरला महुआ मोईत्राला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये महुआ त्यांची बाजू मांडतील. तपशिल देण्यासाठी आयटी मंत्रालय आणि गृह मंत्रालयाला पत्र पाठवले जाईल, असेही समितीने ठरवले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, मोइत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देहद्राईने अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.महुआ मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अलीकडच्या काही दिवसांपर्यंत महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी समूहावर केंद्रित होते. दरम्यान, उद्योगपती हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रांना पैसे दिल्याचा आरोप आहे.