मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी सुलोचना चव्हाण यांचं कमरेचं हाड मोडलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. ‘रंगल्या रात्री’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली होती. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली. भारत सरकारने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत.