नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांच्या दोन रिक्त पदांवर नियुक्तीसाठी केंद्र सरकारने आज सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन नावांची घोषणा केली. मात्र या निवडीला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि निवड समितीवरील एक सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेतला. सरकारने बहुमताच्या बळावर 212 उमेदवारांतून काही मिनिटांत दोघांची निवड केली, असा आरोप चौधरी यांनी केला.
कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने आयुक्त पदांचे संभाव्य उमेदवार म्हणून 212 नावांची यादी आपल्याला बुधवारी रात्री बारा वाजता पाठविली. गुरुवारी दुपारी निवड समितीची बैठक होती. त्यामुळे एवढ्या कमी वेळात 212 जणांची यादी पार्श्वभूमी तपासून पाहणे आपल्याला शक्यच नव्हते. निवड समितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि
आपण स्वतः सदस्य होतो. त्यापैकी आपण एकटेच विरोधी पक्षातून होतो. त्यामुळे मोदींनी बहुमताच्या जोरावर बैठक सुरू होताच काही मिनिटांत संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवड केली, असा आरोप चौधरी यांनी केला.
सुखविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार हे दोघेही 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. संधू हे उत्तराखंडचे तर ज्ञानेश कुमार केरळचे आहेत. संधू याआधी उत्तराखंडचे मुख्य सचिव होते. 2019 पासून आतापर्यंत ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष होते तर ज्ञानेश कुमार हे संसदीय व्यवहार खातेे आणि केंद्रीय सहकार खात्याचे सचिव होते. संसदीय व्यवहार खात्याचे सचिव असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या प्रक्रियेत आणि अयोध्येतील राममंदिराबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत ज्ञानेश कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.