प्रांताधिकारी नितीन महाजन यांची चौकशी करा
संतोष केणे यांची महसूल मंत्रयाकडे मागणी
कल्याण (प्रतिनिधी ) : मुंबई वडोदरा रस्त्यात बाधित झालेल्या शेतकरी महिलेला जागेचा मोबदला दुस-या व्यक्तीला दिल्याने कुसूम सुरोशे या महिलेने प्रांत कार्यालयात वीष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी प्रांताधिकारी डॉ नितीन महाजन यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि आगरी कोळी भूमीपूत्र महासंघाचे नेते संतोष केणे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
रायता येथे राहणा-या सुरोशे कुटूंबियांची जमिन मुंबई वडोदरा रस्त्यात गेलेली आहे. जमिनीच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे त्या जमिनीचा सात बारा सुरोशे कुटूंबियांच्या नावावर आहे. प्रांत कार्यालयात सुरोशे कुटूंबियांना नेाटीसाही प्राप्त झाल्या आहेत. या बदल्यात त्यांना १ कोटी ३ लाख ६९ हजार रूपये मिळणे अपेक्षित होते त्यासाठी त्या कल्याणच्या प्रांत कार्यालयात पाठपुरावा करीत होत्या. मात्र पमनानी नामक व्यक्तीने हरकत घेतल्याने मोबदल्याची रक्कम प्रांत कार्यालयाने त्यांच्या नावे बँकेत जमा केली. त्यामुळे कुसम यांनी प्रांत कार्यालयातच किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुसूम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कल्याणच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रदेश सचिव संतोष केणे गणेश म्हात्रे यांनी रूग्णालयात जाऊन त्या महिलेची चौकशी केली. या प्रकरणानंतर प्रांताधिकारी यांनी पमनानी यांना रक्कम स्थगित केल्याचे पत्र सुरोशे कुटूंबियांना दिले आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रांताधिकारी डॉ नितीन महाजन यांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच समृध्दी महामार्ग शेतक-यांवरही अन्याय झाला आहे त्याबाबतही विचार करावा अशी मागणी केणे यांनी महसूलमंत्रयाना दिलेल्या निवेदनात केली आहे.
—————-