देशाच्या प्रगतीत व्यापारी बांधवांचे मोठे योगदान – सुधीर मुनगंटीवार
मेटल अॅन्ड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन तर्फे ” व्यापारी मित्र ” म्हणून अर्थमंत्र्यांचा सन्मान
मुंबई (अजय निक्ते) : कोणत्याही संस्थेचा विकास हा त्या संस्थेच्या सदस्यांच्या परिश्रमातुनच होतो. या देशाच्या प्रगतीत व्यापारी बांधवाचे मोठे योगदान आहे. हा देश स्टेनलेस स्टील उद्योगाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती करीत आहे याचे सर्वस्वी श्रेय मास्मा अर्थात मेटल अॅन्ड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन या संघटनेचे आहे. या संघटनेने आज “व्यापार मित्र” म्हणून माझा सन्मान केला या बाबत संघटनेचा मी आभारी असून , संघटनेच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी मी सदैव त्यांच्या सोबत आहे व राहील, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुंबईतील नानुभाई देसाई रोड परिसरातील मेटल अॅन्ड स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन ( मास्मा)या संघटनेच्या नुतन कार्यालयाच्या उदघाटन समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. संघटनेच्या वतीने ‘व्यापार मित्र’ हा सन्मान देवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जीएसटी शी संबंधित महाराष्ट्रातील व्यापारी बांधवांनी ज्या मागण्या केल्या त्या मी नेहमीच जीएसटी परिषदेच्या बैठकीत मांडल्या व त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. मास्मा ची मागणी सुध्दा मी जीएसटी परिषदेत मांडेन असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी आ. मंगलप्रभात लोढा, आ. आमीन पटेल, माजी आमदार अतुल शाह, मास्माचे अध्यक्ष जितेंद्र शाह व अन्य पदाधिका-यांसह व्यापारी बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.