गर्भपिशवीत पावणेतीन किलो वजनाची गाठ : कूपर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई : एका ३६ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून तब्बल पावणे तीन किलो वजनाची गाठ यशस्वी शस्त्रक्रिया करून काढण्यात आलीय. इतकी मोठी गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया मुंबई महापालिकेच्या कूपर रूग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे केलीय.
जुहू विलेपार्ले पश्चिम येथे मुंबई महापालिकेचे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ रूस्तम नर्सी कूपर सर्वसाधारण रूग्णालय आहे. पोटात दुखत असल्याच्या कारणावरून एक महिला कूपर रूग्णालयात तपासणीसाठी आली हेाती. सदर महिलेचे पोट हे साधारणपणे ७ महिन्यांच्या गरोदर महिलेप्रमाणे दिसत होते. या महिलेची अधिक तपासणी व आवश्यक त्या अत्याधुनिक चाचण्या केल्यानंतर महिलेच्या गर्भपिशवीत मोठी गाठ आढळून आली. महिलेला सतत होणारा रक्तस्त्राव आणि हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी या पार्श्वभूमीवर ही शस्त्रक्रिया खूपच अवघड व गुंतागुंतीची होती. मात्र कूपर रूग्णालयातील डॉ. गणेश शिंदे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. हेमलता कुहिते, डॉ. हेमा रेलवानी, डॉ. नेही पारिख या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली ही शस्त्रक्रिया सलग दोन तास चालली. या महिलेची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रूग्णालय सुत्रांनी दिली.
गर्भाशयातील गाठीची महत्त्वाची लक्षणे
गर्भाशयातील गाठीच्या लक्षणांबाबत माहिती देताना डॉ. गणेश शिंदे यांनी सांगीतले की, गर्भाशयात गाठ असणा-या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे, मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाचा त्रास होणे, लैंगिक संबंधांदरम्यान त्रास होणे, अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारची लक्षणे आढळून आल्यास महिलांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा व दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.