नायर रुग्णालयात जगातील सर्वांत मोठय़ा टयुमरची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई : नायर रूग्णालयात जगातील सर्वात मोठी टयुमरची( मेंदुच्या गाठी ) शस्त्रक्रिया करण्यात आलीय. टय़ुमरचे वजन १.८७३ किलो होते, जे जगातल्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढलेल्या मेंदू टय़ुमरचे सर्वांत मोठे वजन आहे. अशाप्रकारच्या मेंदुच्या गाठीचे याअगोदर नोंदविलेले वजन १.४ किलोग्रॅम इतके होते. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठया टयुमरची शस्त्रक्रिया ठरलीय. नायर हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती डी. नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया सात तास चालली. यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे गाठीचे निर्मुलन करण्यात आले. रुग्णाला रक्तसंक्रमणाची ११ युनिट रक्त दिले गेले.
कापड विक्रेता असलेले संतलाल पाल, वय – ३१ हे डोकेदुखीच्या आजारामुळे नायर रूग्णालयात दाखल झाले होते. रुग्णाच्या सीटी आणि मेंदुच्या एमआर स्कॅनची तपासणी करण्यात आली तसेच टय़ुमरचा रक्तुपरवठा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट सीटी ऍन्जिओग्राफी करण्यात आली. त्या तपासणीत कवटीच्या हाडांद्वारे मिडलाइनच्या दोन्ही बाजूंवर ३० x ३० x २० सें.मी.ची गाठ पसरली होती. या गाठीमुळे डोक्यावर जडपणा व दृष्टीदोषात वाढ होऊन अंधत्व आले होते. ही शस्त्रक्रिया ही मोठी आव्हानात्मक होती. उत्कृष्ट पेरीऑपरेटीव्ह मॉनिटरिंगमुळे रुग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात पालिका डॉक्टरांना यश आलय. नायर रुग्णालय अशा जटिल शस्त्रक्रिया व्यवस्थापन आणि उत्तम आरोग्य सेवा आणि सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी व्यक्त केले.
़़़़