रस्त्यावर माती टाकल्याने रस्ता गेला चिखलात शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर पालकांमध्ये संतापाची लाट
शहापूर : एकीकडे शहापूर सावरोली या रस्त्याची खड्ड्यांमुळे भयंकर अशी दुर्दशा झाली असताना दुसरीकडे याच परिसरात असणाऱ्या दमानी इंग्लिश मिडीयम शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व शाळेच्या आवारात शाळा व्यवस्थापनाकडून चक्कं माती टाकण्यात आल्याने पावसाळ्यात ही माती वाहून गेली तर रस्त्यावर याच मातीमुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे.या चिखलातून रस्ता शोधत चालताना लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखल तुडवत कसेतरी शाळेत जावे लागत आहे. डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचे सोंग घेतलेल्या शाळा प्रशासनाने याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केल्याने शहापुरात पालकांमध्ये दमानी शाळे विरोधात एकच संतापाची लाट उसळली आहे.
दमानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थेने शाळा सुरू होण्या अगोदर उन्हाळ्यातच नव्याने रस्ता तयार करणे गरजेचे असताना संस्थेने आपल्या अकलेचे तारे तोडत ऐन पावसाळ्यात शाळेच्या आवारात व स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सर्वत्र माती पसरवून ठेवली आहे. पावसाळा सुरू होताच ही माती पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने तेथे रस्त्याऐवजी आता चिखलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दमानी संस्थेने काँक्रीट रस्ता अथवा आवारात खडी तरी पसरविणे गरजेचे असताना आपल्या मनमानीपणे रस्त्यावरच व शाळा आवारात माती पसरवून ठेवली परिणामी या मातीचे आता चिखल झाल्याने या चिखलातून आता सकाळी लहान विद्यार्थी व त्यांच्या पालकांना रस्ता शोधत चालावे लागत आहे.या चिखलातून शाळेपर्यंत चालताना विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे सकाळी शाळेची लगबग आणि पावसाची रिपरिप त्यात शाळेच्या रस्त्यावरही सर्वत्र चिखल झाल्याने विद्यार्थ्यांचे कपडे व पायातील बूट दररोज चिखलाने माखत आहेत हे संतापजनक चित्र पाहून पालकांमध्ये दमानी शाळेच्या या मनमानी कारभारा विरोधात संताप व्यक्त होत आहे.एकीकडे शहापूर वरून येताना सावरोली रस्त्याची देखील खड्ड्यांमुळे प्रचंड अशी दुरावस्था झाली असताना दमानी शाळेच्या या भोंगळ कारभारामुळे शाळेचा संपूर्ण रस्ता व शाळेचे आवार हे चिखलाने व्यापल्याने मुलांना शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.याबाबत अनेक पालकांनी दमानी शाळेकडे तक्रारी केल्या परंतु डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचे सोंग घेतलेल्या संस्थेने याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याने पालकांत शाळे विरोधात असंतोष पसरला आहे.
दमानी इंग्लिश मीडियम स्कूलने शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर व आवारात माती पसरवून ठेवल्याने येथे सर्वत्र चिखल झाले आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या चिखलातून चालताना प्रचंड असा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत सदर शाळेने चिखलयूक्त झालेली माती तात्काळ हटवून त्या ठिकाणी खडीकरण किंवा कॉंक्रीट रस्ता मुलांसाठी तयार करावा :- विजय भगत उपनगराध्यक्ष नगरपंचायत शहापूर :