मुंबई, दि. २२ : देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, सरकार शेतमालाची खरेदीच करत नाही. त्यामुळे हमीभावाचा उपयोग नाही. बाजारात दर कमी असेल तर हमीभावाने माल खरेदी करून शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारने दूर केल्या पाहिजेत. हमीभाव जाहीर करायचा आणि खरेदी करायचा नाही. अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे. गहू उत्पादक राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, अशा शब्दात सरकारला फटकारत केंद्र सरकारने खरेदीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
केंद्र सरकारचा हमीभावाचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारचे आयात निर्यात धोरण चुकीचे आहे. पेरा वाढविण्याचे सरकारकडून आवाहन केले जाते पण खरेदीची हमी दिली जात नाही. शेतकऱ्यांना गेल्या नऊ वर्षात हाच अनुभव सातत्याने येत असल्याने सरकारवर आता विश्वास राहिला नाही. सरकारकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा पाऊस नाही, दुष्काळी स्थिती आहे. धरणात पाणी नाही. उत्पादन वाढीवर मर्यादा येणार आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, अशी भूमिका श्री. वडेट्टीवार यांनी मांडली आहे.
केंद्र सरकारच्या नकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मे 2022 मध्ये केंद्र सरकारने हरभरा खरेदी बंद केली. उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा कांगावा केला. त्यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा पडून राहिला. एकीकडे केंद्राची खरेदी नाही, बाजारात दर नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली. हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला. आता हरभऱ्याच्या हमीभावात 250 रुपयांची वाढ अपेक्षित होती. परंतु ती 105 रुपये केली आहे. सूर्यफूल, मसूर सारख्या इतर शेतमाल उत्पादनाची अशीच परिस्थिती आहे. गहू, तांदळाचे हमीभाव समाधानकारक नाहीत. बाजारभावापेक्षा कमी दर असल्याने तिथे देखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हमीभावाचे गाजर दाखवणाऱ्या सरकारला बळीराजा धडा शिकवेल, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली.