मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण, आंदोलनंही केलं. मात्र, अद्याप मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारला पु्न्हा एकदा इशारा देत सूचक विधान केलं. “आरक्षण घेण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आता सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही”, असं सूचक विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे.
“मला मराठा समाजाविरोधात बोललं की सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना माहिती आहे की समाजाच्या प्रश्नांसाठी हा ताकदीने लढतो. याला तेथून बाजूला करायचं. त्यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत. माझ्या विरुद्ध सर्वांनी षडयंत्र रचलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशा पाच ते सहा टोळ्या उभ्या केल्या आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही”, असंही मनोज जरांगे म्हणाले.