सोशल मीडियावर महिलांची बदनामी रोखण्यासाठी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सायबर कमिटी :
राज्य सरकारला शिफारसी देणार.
मुंबई – सामाजिक माध्यमातून (सोशल मीडिया) महिलांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना
रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सायबर समिती स्थापन केलीय. या समितीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत उद्या (दि. ८ मे) होणार आहे.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, मुंबई पोलीस उपायुक्त डॉ रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीबाबत अनुभव असलेले वकील ऍड प्रशांत माळी, ऍड वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार आणि लेखिका श्रीमती मुक्ता चैतन्य यांचा समावेश आहे. तसेच आणखी काही पोलिस अधिकारी व मान्यवरांचा ही समावेश असणार आहे.
सामाजिक माध्यमाद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. नोकरदार महिला, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला तसेच महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात
आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. याबाबत बॊलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या कि, जाहीर अवमानकारक टिप्पणीचा महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते तेव्हा अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. म्हणून तज्ञ् व्यक्तींचा समावेश असलेली समिती आयोगाने स्थापन केली असून यासंदर्भात समितीकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला
जाईल.
*****