रत्नागिरी, दि.12: पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत आणि मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची घोषणा आज उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एसआयटी चौकशीची घोषणा केली. शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा पोलीस कोठडीत आहे. या सगळ्या धक्कादायक जीवघेण्या प्रकरणात वारिसे यांचे कुटुंब कोलमडून पडले आहे. त्यांच्या कुटुंबाची व्यथा माध्यमांनी लावून धरत वास्तव जगासमोर आणले. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणीने जोर धरला. अखेर आज या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने वारिसे यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर शिक्षण घेत असलेल्या वारिसे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. एक मुलगा आणि त्यांची आजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वारिसे कुटुंबियांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी  मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख व इतर माध्यमातून १५ लाख अशी मदत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही उदय सामंत यांनी स्वीकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *