मुंबई, दि. २ः राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांसाठी मेगाभरती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ७१७ रिक्त जागांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारपर्यंत (ता.४) मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११.५५ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्तांना अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक, लघुटंक लेखक, जवान, वाहनचालक आणि चपराशी या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागांसाठी १७ नोव्हेंबर २०२३ पासूनऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. त्यात राज्यात अनेक भागांत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा खंडीत झाली होती. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. देसाईंनी या मागणीची दखल घेत, सोमवार दि. ४ डिसेंबरपर्यंत रात्री ११.५५ वाजेपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने ३० मे २०२३ भरतीबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी ३० मे ते ९ जून २०२३ या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क भरले आहे. त्यांना अर्जात ०६ डिसेंबरपासून सकाळी ११ ते ८ डिसेंबर २०२३ पर्यंत सांयंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत बदल केला जाणार आहे.  

विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये. त्यामुळे ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री देसाईंनी दिली. तसेच अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास सरकार कटिबद्ध असून सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन भरती प्रक्रियेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन देसाईंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!