विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत गौप्यस्फोट

नागपूर १४ :- ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा, ओबीसी समाजातील युवकांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा गावगाड्यातील माणूस गुण्या-गोविंदाने रहावा, अशी ठाम भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली. त्याचबरोबर विदर्भातील एका मंत्र्याने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा अपमान केला म्हणून त्यांनी राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट श्री. वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात ते बोलत होत. वडेट्टीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले. या स्वराज्यात सर्व जाती धर्माची माणसं गुण्या-गोविंदानं राहत होती. पण आज महाराष्ट्रात परिस्थिती बदलत आहे. एकमेकांचे साथीदार वैरी होत आहेत. सरकारने समाजात सलोखा निर्माण केला पाहिजे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा विदर्भातील मंत्र्याने अपमान केला. या अध्यक्षाना, सदस्यांना राजीनामा द्यायची वेळ आणली, हे कोणामुळे झालं, अशा पद्धतीने का वागणूक दिली जाते. हे योग्य नाही. असे खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले.

. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजातील अनेक जातींना हक्काचं घर नाही. वाशीम मधील पाड्यावर मुलींना अंघोळीला पाणी मिळत नाही. गरिबीमुळे मुलींचे शोषण केले जाते. हे गंभीर असून, आपण या समाजाच्या समस्यांचा विचार करणार आहोत कि नाही. समाजा-समाजात मतभेद निर्माण करून राज्याला अधोगतीकडे न्यायचे आहे का? या राज्यातील तरुण नोकरीसाठी फिरतोय. शेतकरी आत्महत्या करतोय. चंद्रपुरात ओबीसी युवकांचे उपोषण सुरु आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत, अशा इतर सर्व समाजाच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारमधील मंत्रीच मागण्या करत आहेत. हे मंत्री कॅबिनेटमध्ये का मागण्या करत नाहीत, का बोलत नाहीत, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

मराठा समाजाला आरक्षण देऊ, ओबीसी हक्काचं संरक्षण करू अशी भूमिका असली पाहिजे. ओबीसी आमचा डीएनए असं म्हणणाऱ्याना ओबीसीसाठी वेळ मिळत नाही. पदभरती, महागाई ,बाहेर जाणारे उद्योग हे विषय आता बाजूला पडले आहेत. आता तर अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात अबकड वर्गीकरण सरकार आणणार आहे. म्हणजे पुन्हा जातीजातीत भांडणे लावण्याचा डाव आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी समाजात हक्काचं घर नसलेल्या अनेक जाती आहेत. मी मंत्री असताना घरकुल योजना आणली. ७० हजार घरकुले झाली. ओबीसींच्या ७२ वसतिगृहांसाठी पाठपुरावा सुरु आहे. ओबीसींच्या कार्यालयासाठी २८ कोटी मागितले आहेत. ओबीसींसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेतले जात नाही. सरकारला उपाशी माणसाच्या वेदनांची जाणीव नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *