मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी चाल करीत जोरदार निदर्शने केली यावेळी आंदोलकांकडून चप्पल आणि दगडही भिरकावण्यात आले. शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले मात्र आंदोलक आक्रमक असल्याने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शरद पवारांसारख्या मोठया नेत्यांच्या घरासमोर अचानक अशा प्रकारचे आंदोलन झाल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडालीय. या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केलीय.
गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचारी एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं, या मागणीसाठी संपावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कामावर रूजू होण्याचे सांगितले आहे. गुरूवारी न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचा-यांनी जल्लाेष केला असतानाच, शुक्रवारी कर्मचा-यांनी शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केले. एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं सिल्व्हर ओकवर जमले होते आणि त्यातील काही कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना लोटून बंगल्याच्या आवारात घुसले. त्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी एक स्कूल व्हॅनमध्ये आंदोलकांना ताब्यात घेतलं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले होते.
सुप्रिया सुळेंकडून हात जोडून विनंती
खासदार सुप्रिया सुळे या निवासस्थानी पोहचल्यानंतर आंदोलकांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “आंदोलकांना बोलायचं असेल तर माझी ऐकायची तयारी आहे,” “मी सर्वांना हात जोडून विनंती करते,” असंही त्या म्हणाल्या. मी तातडीने चर्चा करायला तयार आहे, माझी सर्वांना शांततेनं बसण्याची विनम्र विनंती आहे, असंही त्या म्हणाल्या.
शरद पवार म्हणाले,….
“मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या आंदोलनानंतर दिली. “टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा आणि माझ्या पक्षाचा घनिष्ठ संबंध आहेत. गेले 40-50 वर्षं त्यांचं एकही आधिवेशन मी चुकवलेलं नाही. निर्माण झालेले प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवले. याच वेळेला त्यांना एक चुकीचा रस्ता दाखवला गेला. त्याचीच प्रतिक्रिया आज इथं दिसली. असं शरद पवार म्हणाले.
पोलिसांचे अपयश … अजित पवारांची नाराजी
शरद पवारांच्या निवासस्थानी अचानक एसटी कर्मचा-यांकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पोलिसांचे अपयश असल्याची प्रतिक्रिया मिडीयाला दिली. आंदोलनकर्ते आक्रमकपणे पवारांच्या घराच्या आवारात शिरून दगडफेक आणि चप्पल फेक केली. मात्र पोलीस प्रशासन आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला याचा थांगपत्ताही नव्हता का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. कारण आक्रमक झालेले एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पोलीस जागे झाले आणि जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न करू लागल्याचं दृष्य पाहायला मिळालं. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांच्या कारभाराविषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे.
या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयाने सुद्धा त्याची नोंद घेत एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी देखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचत असतानाच अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून तो घोषणाबाजी, दगडफेक व चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना मी गृहमंत्र्यांना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात. या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना अटक …
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांचे चार ते पाच वरिष्ठ पोलिस अधिकारी गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घरी पोहोचले. त्यांनी सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गुणरत्न सदावर्तेंवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले,,, पोलिसांनी आपल्याला कोणीतीही नोटीस न देता ताब्यात घेतलं आहे. गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांच्याविरोधात आपल्या पत्नीने तक्रार केली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. माझा खून होऊ शकतो. माझी हत्या होऊ शकते, असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.