राज्य शासनाच्या निषेधार्थ कल्याणात एसटी कामगारांचे मुंडन
कल्याण (प्रवीण आंब्रे): सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून राज्यभरात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. राज्य शासनाकडून अद्याप कामगारांची मागणी मान्य न झाल्याने कल्याण येथील संतप्त एसटी कामगारांनी शासनाच्या निधेषार्थ मुंडन केले.
राज्य शासनाच्या विरोधात व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात यावेळी कामगारांनी घोषणाबाजी केली. कामगारांची दिवाळी अंधारात ढकलणाऱ्या सरकारला कर्मचाऱ्यांनी चिल्लर गोळा करुन दिवाळीची भेट दिली. संपादरम्यान अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील बस डेपोतील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कामगारांमध्ये अधिकच संताप दिसून येत होता. या आंदोलनात महिला कामगार देखील सहभागी झाल्या होत्या. डेपोत आज तिसऱ्या दिवशीही शुकशुकाट होता. संप मिटण्याच्या अपेक्षेने काही प्रवाशांनी बस आगारात फेऱ्या मारल्या. तर लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या प्रतिक्षेत काही प्रवासी आगारात बसून असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र चौकशी व उद्घोषणा कक्षात कोणीही उपस्थित नव्हते.