मुंबई : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिकांच्या मूळ पगारात ३ हजार ६०० रूपयांपासून ते ७ हजार २०० रूपयांपर्यंत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही परब यांनी यावेळी केले. एसटी कर्मचा-यांनी एक लढाई जिंकली असली तरी विलगीकरणाच्या मुद्दयावर कर्मचारी ठाम असल्याने संप सुरूच आहे, परिवहन मंत्रयाच्या घोषणेवर कर्मचारी गुरूवारी निर्णय घेणार आहेत.
परिवहन मंत्री परब म्हणाले, एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, तसेच संपकाळात निलंबित व सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे परब यांनी जाहीर केले. तसेच नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही शासनाने घेतली आहे,असेही मंत्री परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह येथे कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरु होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत श्री. परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मा.न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळासमोर ठेवला होता तसेच शिष्टमंडळाने याबाबत पर्याय द्यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार बुधवारीही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एसटी कामगारांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते. त्यानंतर आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री परब यांनी कामगारांच्या वेतनवाढीची घोषणा केली.
समितीच्या अहवालावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल
कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीसंदर्भात मा.न्यायालयाने समिती नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत दिली आहे. परंतु, समितीला दिलेल्या मुदतीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जनता, शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे नुकसान होऊ नये म्हणून ही वेतनवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीचा अहवाल जो येईल त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. संपाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. कामगारांनी ही एक पाऊल पुढे टाकून संप मागे घ्यावा, असे आवाहनही परिवहन मंत्री परब यांनी यावेळी केले.
उत्पन्नवाढ झाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार
दरम्यान एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. कामगारांनी आत्महत्या करू नये, आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही श्री. परब यांनी यावेळी सांगितले.
अशी असेल सुधारित वेतनवाढ (सरासरी)
१. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी ५ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ७ हजार २०० रुपये वाढ होते.
२. १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी ४ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ५ हजार ७६० रुपये वाढ होते.
३. २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २ हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ३ हजार ६०० रुपये वाढ होते.
४. ३० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २ हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे इतर भत्तासह त्याच्या एकूण वेतनामध्ये ३ हजार ६०० रुपये वाढ होते.
़़़़