मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज एसटी कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यापुढं एक अट ठेवली. “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,” असं राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं.

गेल्या देान आठवडयापासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर एसटी महामंडळाकडून निंलबनाच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांनी संप मागे घ्यावा व कामावर रूजू व्हावे असे आवाहन केले आहे. प्रवाशांना वेठीस धरू नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने संपक-यांना फटकारले हेाते तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. हे सगळे प्रकार सुरू असतानाच एसटी कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी ही अट पुढे ठेवली. अल्पवेतन, वेतन विलंब, कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या अतिगंभीर समस्या तसंच ‘राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी’ या विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी एका कर्मचा-याने आपली व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडली.

तोडगा निघेना, संप मिटेना…

गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असून अजूनही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. एसटी कर्मचा-यांनी आझाद मैदानात ठाण मांडले आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचा-यांसाठी लढा देत आहेत. तर एस.टी. महामंडळाने संपावरील कर्मचार्‍यांशी वाटाघाटी सुरू ठेवत असतानाच कारवाईचा बडगाही उगारला आहे. आतापर्यंत २०५३ संपकरी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. परिवहनमंत्री अनिल परब आणि एस.टी. कर्मचारी संघटना शिष्टमंडळाबरोबरची चर्चा निष्फळ ठरली आहे. एसटी कर्मचारी आपल्या संपावर कायम आहेत. तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामावर हजर व्हा; अन्यथा पगार कापू असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *