मुंबई : राज्यातील एसटी कामगारांचं वेतन पुन्हा एकदा थकले आहे. फेब्रुवारी महिन्याची दहा तारीख उलटली तरी जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप एसटी कामगारांच्या खात्यावर जमा झालेले नाही. उद्या शनिवार व नंतर रविवार असल्याने पुढील दोन दिवसातही एसटी कर्मचऱ्यांना वेतन मिळणे कठीण दिसत आहे.
मागील वर्षी झालेल्या ऐतिहासिक संपानंतर वेळेत आणि चांगले वेतन हाती येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना असून पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
एसटी कामगारांना दर महिन्याच्या दहा तारखे आधी वेतन देण्याची हमी राज्य शासनाने उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. मात्र ही हमी पाळण्यात राज्य शासन पुन्हा एकदा अपयशी ठरलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कामगारांना दिलासा देणार का? असा प्रश्न एसटी कामगारांमधून विचारला जात आहे.