ठामपाच्या सिग्नल शाळेच्या प्रयोगाला यश : दहावीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण
शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेने उचलली
ठाणे (प्रतिनिधी) – रस्त्यावरील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या सिग्नल शाळेच्या अभूतपूर्व प्रयोगाला यश आलय. यंदा प्रथमच दहावीच्या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. मोहन काळे याला ७६ टक्के आणि दशरथ पवार याला ६४ टक्के मिळाले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघा विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यासह पुढील शिक्षणाची जबाबदारी शिवसेना उचलेल, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली.
सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा किडुकमिडुक विकून गुजराण करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ ही सेवाभावी संस्था यांनी तीन हात नाका येथील उड्डाणपुलाच्या खाली सिग्नल शाळा सुरू केली. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावे, या प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारे चाचपडत असताना ठाणे महापालिकेने मात्र हा अभूतपूर्व प्रयोग यशस्वीरित्या राबवला. या शाळेच्या माध्यमातून यंदा प्रथमच दोन विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मोहन काळे याला आयटीआय मधून तंत्रप्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, तर दशरथ पवार याला पोलिस दलात जाण्याची इच्छा आहे. अक्षरओळखच नव्हे, तर नागरी संस्कृतीशीही फारसा परिचय नसलेल्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे जिकरीचे होते. सिग्नल शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना या विद्यार्थ्यांना सुरुवातीला केवळ शिकवण्याचेच नव्हे, तर प्रसंगी आंघोळ घालून तयार करण्याचे कामही करावे लागले. ही मुले दिवसभर छोटीमोठी कामे करून किंवा प्रसंगी भीक मागून घर चालवण्यासाठी हातभार लावत; त्यामुळे त्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्या आईवडलांना राजी करणे हे देखील अतिशय अवघड होते. अशा सर्व आव्हानांचा मुकाबला करत ठाणे महापालिका, समर्थ भारत व्यासपीठ हे यश मिळवलय.