ठाणे, दि.12 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता उच्च माध्यमिक (इ.12वी) व माध्यमिक (इ.10 वी) परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्जाची मुदत 27 ऑक्टोंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
राज्य मंडळाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, सन 2022 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा अर्जऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दि. 16 सप्टेंबर 2021 ते दि.12 ऑक्टोबर 2021 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन बुधवार दि. 13 ऑक्टोबर ते बुधवार दि. 27 ऑक्टोंबर 2021 पर्यंत भरण्यात यावे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 ते गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत जमा करावे, असे डॉ. भोसले यांनी कळविले आहे.