बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच दुबईत निधन
दुबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच शनिवारी रात्री दुबईत निधन झालय. ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. दुबई एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ज्यूली या चित्रपटात श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘सोलावा सावन’ (१९७८) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘मकसद’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’ आदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या विनोदी धाटणीच्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रीदेवी यांनी ‘सदमा’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
——-
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट….
जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.
—
प्रतिक्रिया
अष्टपैलू अभिनेत्री गमावली :- मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकीर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे साकारल्या होत्या. विशेषत: सदमा, चांदणी, लम्हें यासारख्या चित्रपटांपासून ते अलीकडच्या इंग्लिश विंग्लिशपर्यंतच्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहतील. अभिनय, सौंदर्य आणि कलानिपुणता यांचा अनोखा संगम असलेल्या श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्याला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त करून दिले होते.’
—-०—-